मुरादाबाद : उत्तर प्रदेशमध्ये थकीत ऊस बिलाचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटना थकीत ऊस बील प्रश्नावरून आक्रमक झाल्या आहेत. उसाची थकीत बिले मिळावीत या मागणीसाठी भाकियूने (टिकैत) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. याबाबत जिल्हा दंडाधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रश्नांची तातडीने सोडवणूक केली जावी, अशी मागणी करण्यात आली.
भाकियूच्या टिकैत गटाचे जिल्हाध्यक्ष मनोज चौधरी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आंबेडकर पार्क येथून मोर्चा काढण्यात आला. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. राजा शुगर मिलने उसाची बिले दिलेली नाहीत. त्यांना याबाबत तातडीने निर्देश द्यावेत, असे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. याप्रकरणी कारखाना व्यवस्थापनावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय वीज फिडरवर ट्रिपिंगचा प्रश्न, सर्व कालव्यांत पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली. आदोलनात भाकियूचे राष्ट्रीय सचिव डॉ. नौ सिंग, ऋषीपाल चौधरी, महानगर अध्यक्ष पंकज चौधरी, विभागीय उपाध्यक्ष यशपाल, अमित चौधरी, कपिल मीना शुभम राठी आदी उपस्थित होते.