नांदेड : शंकरनगर (ता. बिलोली) येथील गोदावरी मनार सहकारी साखर कारखान्याच्या तत्कालीन सर्व साखर कामगारांनी थकित पगार द्या अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करू असा एकमुखी निर्णय घेतला आहे. थकित व अंतिम पगार मिळविण्यासाठी कामगारांची शंकरनगर येथे बैठक पार पडली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती साखर कामगार संघटनेचे सचिव मारोतराव सावळे यांनी दिली.
गोदावरी मनार सहकारी साखर कारखाना बंद अवस्थेत असून अवसायानात निघालेला आहे. तो नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व्यवस्थापनाच्या ताब्यात आहे. कारखाना सुरू असताना २००१-०३ या कालावधीतील कामगारांच्या अंतिम पगाराबाबतचे प्रकरण औद्योगिक न्यायालय जालना येथे प्रलंबित आहे. या प्रकरणाचा निकाल आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्या अनुषंगाने बैठकीत विविध विषयावर चर्चा करून पुढची दिशा ठरविण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष रामराव देगलूरे, सचिव मारोतराव सावळे, मधुकर जहागिरदार, अरुण डोणगावकर, माणिक सुर्यवंशी, शेषेराव हुस्सेकर, बालाजी बिजूरकर, शेख अब्दुलसाब, हाणमंत भोसले, गणपत भुसावळे, शिवाजी भिसे, श्रीधर पांचाळ , गंगाधर संकटे, गंगाधर बोईवार, रामराव फरसे आदी उपस्थित होते.