सोलापूर : गेल्यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे साखर कारखाने अडचणीत सापडतील असा अंदाज चुकीचा ठरला. तुलनेने यंदाचा गाळप हंगाम उत्तम चालला असून देशात सर्वाधिक गाळपाचा मान महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीने मिळवला. सरासरी साखर उताऱ्यातही महाराष्ट्र अव्वल स्थानी राहिला. यंदाच्या हंगामात १०७३ लाख टन उसाचे गाळप झाले असून ११० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. सुरुवातीच्या काळात शंभर दिवस हंगाम चालेल की नाही याची शाश्वती कोणालाच वाटत नव्हती. मात्र, यंदा १३० दिवस हंगाम चालल्याने साखर उद्योग खुश आहे.
सरकारी यंत्रणांनी मागील वर्षाच्या तुलनेत यंदा किमान १५ ते २० टक्क्यांनी गाळप कमी होईल, असा अंदाज वर्तवला होता. मात्र, सर्वांचाच अंदाज चुकीचा ठरला. ५८८ लाख टन गाळप होईल आणि ९० लाख टन साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज चुकीचा ठरला. थांबून थांबून झालेला पाऊस उसासाठी पोषक ठरला. मागील वर्षी सततच्या पावसामुळे प्रति हेक्टरी ऊस उत्पादन तसेच साखर उताराही वाढला. दुसरीकडे इथेनॉल उत्पादन वाढले तर साखरेचे उत्पादन कमी होईल ही भीती सरकारला होती. इथेनॉल बंदीमुळे साखर कारखान्यांना मोठा फटका बसला. सद्यस्थितीत साखर कारखानदार साखरेच्या खरेदी दरात वाढ करण्याची मागणी करीत आहेत. केंद्र सरकारने पाच वर्षांत या दरात बदल केलेला नाही.