सोलापूर : भीमा सहकारी साखर कारखान्याने मोहोळ येथील एका शेतकऱ्याचे ६७ टन उसाचे बिल थकवले आहे. मच्छिन्द्र पवार असे या शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याने एक ट्रॅक्टर घेतला होता. फायनान्सने या ट्रॅक्टरचे हप्त्याच्या वसुलीसाठी तगादा लावल्याने शेतकऱ्याने आपला ट्रॅक्टर विहिरीत ढकलून दिला. या शेतकऱ्याचे कारखान्याकडे उसाच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम १ लाख ५०० रुपये थकीत आहेत. राज्यसभेचे भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांचा सोलापुरातील हा कारखाना आहे.
‘एबीपी लाईव्ह’ने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोना काळात पवार यांनी फायनान्सद्वारे कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी केला. त्यामुळे फायनान्स कंपनीने हप्त्यासाठी तगादा लावला आहे. त्यामुळे मी माझा ट्रॅक्टर विहिरीत ढकलून दिला आहे. जर मला फायनान्स कंपनीने आणखी त्रास दिला तर मी आणखी काय करून घेईन हे तुम्हाला माहिती आहे, असा धमकीवजा इशारा मच्छिंद्र पवार यांनी दिला आहे. पवार हे आपल्या थकीत ऊस बिलापोटी कारखान्याकडे वारंवार पाठपुरावा करीत होते. त्यासाठी कारखान्याचे चेअरमन आणि अधिकाऱ्यांना वारंवार फोन करून त्यांनी बिलाची मागणी केली. तरीही काही झाले नाही असे त्यांचे म्हणणे आहे.