लुधियाना : लोकसभा निवडणुकीदरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी काँग्रेस सत्तेत आल्यास ‘शेतकरी कर्जमाफी आयोग’ आणू असे आश्वासन दिले. ‘जेवढी गरज असेल तितक्या वेळा’ शेतकऱ्यांची कर्जे माफ केली जातील. संविधान वाचवण्यासाठी निवडणूक लढवली जात आहे, असे राहुल गांधी म्हणाले. लुधियानामध्ये एका जाहीर सभेत राहुल गांधी म्हणाले कि, इतिहासात पहिल्यांदाच ही निवडणूक संविधान वाचविण्यासाठी आहे. राज्यघटना बदलून फाडून टाकू, असे उघडपणे एखाद्या पक्षाने पहिल्यांदाच सांगितले आहे. पण, संविधान केवळ एक पुस्तक नसून गरिबांचा आवाज आहे. भाजप फक्त अब्जाधीशांसाठी काम करते आणि त्यांना देशात २२-२५ लोकांची राजवट हवी आहे, असा आरोप गांधी यांनी केला.
तीन कृषी कायद्यांवरूनही त्यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली आणि त्यांनी शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीची कायदेशीर हमी दिली नाही, असे राहुल गांधी म्हणाले. ते म्हणाले की, भाजपला २२-२५ लोकांचे राज्य हवे आहे. सर्व विमानतळ, बंदरे, सौर ऊर्जा, पायाभूत सुविधा, संरक्षण उद्योग हे अदानींसारख्या लोकांना दिले. पंतप्रधान मोदींनी २२-२५ लोकांचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. जेव्हा शेतकऱ्यांनी एमएसपी मागितली तेव्हा पंतप्रधान मोदींनी एमएसपी देणार नसल्याचे उघडपणे सांगितले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी असेही आश्वासन दिले की, पक्ष एमएसपीसाठी कायदेशीर हमी देईल आणि ‘शेतकरी-अनुकूल’ पीक विमा पॉलिसी आणेल.
ते म्हणाले, आमच्या आघाडीचे सरकार सत्तेवर येताच आम्ही देशभरातील शेतकऱ्यांची कर्जे माफ करू. आम्ही फक्त एकदाच शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार नाही, तर त्यासाठी एक आयोग तयार करून त्याला ‘शेतकरी कर्जमाफी आयोग’ असे नाव देऊ. जितक्या वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे, तितक्या वेळा आयोग सरकारला त्याची माहिती देईल. ते म्हणाले, आम्ही शेतकऱ्यांना कायदेशीर एमएसपीची हमी देऊ. पंतप्रधान मोदींनी पीक विमा पॉलिसी आणली, पण त्याचा फायदा फक्त १६ कंपन्यांना झाला. आम्ही ही योजना बदलू आणि शेतकरी अनुकूल योजना आणू. तुम्हाला, शेतकऱ्यांना ३० दिवसांच्या आत नुकसान भरपाई मिळेल. दरम्यान, एक जून रोजी एकाच टप्प्यात पंजाब आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडच्या १३ जागांवर मतदान होणार आहे. मतमोजणी ४ जून रोजी होईल. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस १३ पैकी ८ जागा जिंकून राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. भाजप आणि शिरोमणी अकाली दलाने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या होत्या. तर आम आदमी पार्टीला संगरूरची एकमेव जागा जिंकता आली होती.