सांगली : जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात दुष्काळजन्य स्थितीमुळे अनेक भागांत ऊस वाळला आहे. त्यामुळे उसाचा उतारा घटणार आहे. साखर कारखान्यांनाही उसाची कमतरता भासणार आहे. पुढील वर्षी गळितास जाणारे क्षेत्र केवळ २८ हजार ३०८ हेक्टरच आहे. गतवर्षीच्या तुलनेत ऊस लागवड क्षेत्रात ६ हजार ७७७ हेक्टर क्षेत्राने घट झाली आहे. ऊस पिकांची वाढही झालेली नाही. त्याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे. उसाचा उतारा घटल्याने उसाचे आगर समजल्या जाणाऱ्या वाळवा तालुक्यात पुढील गळीत हंगामात उसाची टंचाई जाणवणार आहे.
यंदा पावसाअभावी उसाची वाढ खुंटली आहे. विहीर, बागायती परिसरातील विहिरींची पाणी पातळी खालावल्याने पाण्याची कमतरत आहे. वळीव झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस पिकाला रासायनिक खते टाकलेली नाही. शिवाय, हुमणी किडीचा पुन्हा प्रादुर्भाव वाढला आहे. वाळवा तालुक्याचे पीकक्षेत्र ८०,५३० हेक्टर आहे. पिकाखालील क्षेत्र ६९,५६० हेक्टर आहे. गेल्यावर्षी तालुक्यात ३५,०८५ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागण झाली होती. यावर्षी पावणेसात हजार हेक्टरची घट यात झाली आहे. पुढीलवर्षी गाळपास २८,३०८ हेक्टर ऊस असेल. यात आडसाली ऊस १४,९५४ हेक्टर, पूर्वहंगामी १,९८९ हेक्टर, सुरू ४५५ हेक्टर, खोडवा १०,९१० हेक्टर पिकांचा समावेश आहे. त्यामुळे साखर कारखान्यांकडून उसाची पळवापळवी होण्याची शक्यता आहे.