पुणे : राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत मान्सूनचा पाऊस सरासरीच्या ९९ टक्के पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांच्या अंदाजानुसार नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पडणारा पाऊस यंदा चांगला राहील. सन २०२४ मधील उन्हाळी हंगामातील ठराविक कालावधीचे कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग आणि सूर्य प्रकाशाचा कालावधी आदी घटकांच्या नोंदीवर हा अंदाज आधारित आहे.
याबाबत डॉ. साबळे यांनी सांगितले की, मॉन्सूनचे आगमन कोकणात ६ जूनपर्यंत होईल. १५ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल. यंदा पावसाच्या वितरणातील फरकाबरोबरच पावसात पडणारे खंड आणि कमी कालावधीमध्ये अधिक पाऊस ही या हंगामातील मुख्य वैशिष्ट्य ठरणार आहेत. बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही सागरातील शाखा यंदा सक्रिय राहतील. डॉ. साबळे यांच्या स्थानिक ठिकाणच्या पाऊस अंदाज मॉडेलनुसार संबंधित ठिकाणचे गेल्या ३० वर्षांचे हवामान आणि कृषी विद्यापीठांच्या हवामान केंद्रांनी नोंदविलेली यंदाची हवामान घटक स्थिती विचारात घेतली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी पट्टा आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांत तेथील सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचे संकेत आहेत. शेतकऱ्यांनी मॉन्सूनच्या आशेवर धुळवाफेची पेरणी करू नये. जमिनीत पुरेसा (६५ मिमी) ओलावा असल्याशिवाय पेरणी करू नये असे आवाहन केले आहे. जून, जुलैच्या पावसात खंड पडतील. मात्र ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पाऊस वाढेल, असे ते म्हणाले.