बेळगाव : आता खरीप हंगामातील कामांनी वेग घेतला आहे. पेरणीची कामे सुरू असतानाही बहुतांश साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिले दिलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थक कोंडी झाली आहे. ही बिले त्वरीत मिळावीत अशी मागणी रयत संघटनेने जिल्हा प्रशासनाकडे केली. याप्रश्नी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली जाणार आहे, असे संघटनेच्या सूत्रांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी सांगितले की, दुष्काळामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. शेतकरी आर्थिक संकटात आहेत. तरीही अनेक शेतकऱ्यांना कारखान्यांनी ऊसाचे पैसे दिलेले नाहीत. तातडीने ऊस बिले मिळण्याची गरज आहे. याबाबत शेतकरी नेते आप्पासाहेब देसाई म्हणाले की, कारखान्यांनी पैसे दिले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून निवेदन देणार आहे. यापूर्वीही निवेदन दिले होते. आता दुर्लक्ष केल्यास धरणे आंदोलन केले जाईल.