हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
मुंबई, 8 जून : मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची भेट घेतली. एसईबीसी आणि आर्थिक कमकुवत घटकांना आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी वैद्यकीय शाखेच्या जागा वाढवून देण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शाह, केंद्रीय संरक्षण मंत्री श्री राजनाथसिंह यांचीही मुख्यमंत्र्यांनी आज नवी दिल्लीत भेट घेतली.
श्री फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल महाराष्ट्राच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले. विविध विषयांवर यावेळी चर्चा करतानाच केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मिळालेली दुष्काळ निवारणासाठीची मदत आणि राज्य सरकारने दुष्काळ निवारणासाठी केलेल्या उपाययोजना इत्यादींची माहिती यावेळी त्यांना दिली.