महाराष्ट्रातील भाजपच्या खराब कामगिरीची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली, उपमुख्यमंत्रिपदावरून मुक्त करण्याची केली मागणी

मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या जागांमध्ये मोठी घसरण झाल्यानंतर, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पक्षाच्या खराब कामगिरीची जबाबदारी स्वीकारली आणि त्यांना मंत्रिपदावरून मुक्त करण्याची सर्वोच्च नेतृत्वाकडे विनंती केली. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षासह महायुतीला मिळालेले अपयश बघता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मोकळे करण्यात यावे, अशी मागणी वरिष्ठांकडे करून राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे.

मुंबईत प्रसारमाध्यमांना संबोधित करताना फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत जे काही नुकसान झाले, त्याची संपूर्ण जबाबदारी मी घेतो. कारण माझ्या पक्षाचे मोठे नुकसान होत असल्याने मला मंत्रीपदावरून मुक्त करावे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी वेळ देण्याची गरज आहे. दरम्यान, इंडिया ब्लॉकवर निशाणा साधत फडणवीस म्हणाले, एकट्या भाजपने इंडिया ब्लॉकपेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. त्यांनीच संविधान बदलण्याचा खोटा प्रचार केला. आम्हाला तो प्रचार नियंत्रित करणे आवश्यक होते, जे आम्ही करू शकलो नाही.

अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर ४ जून रोजी निकाल लागला. यंदाचा निकाल अनपेक्षित आणि सर्वच राजकीय विश्लेषक आणि एक्झिट पोल्सना धक्का देणारा ठरला. भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करेल, असा अंदाज वर्तविण्यात येत असतानाच प्रत्यक्षात मात्र भाजपाला २४० जागांवर समाधान मानावे लागले आहे. बहुमताचा २७२ हा आकडा गाठण्यासाठी आता त्यांना इतर सहयोगी पक्षांची मदत घ्यावी लागली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने देशभरात चांगली कामगिरी करत ४४ खासदारांच्या संख्येवरून थेट ९९ वर मजल मारली आहे. तसेच इंडिया आघाडीतील इतर घटक पक्षांचीही कामगिरी उत्तम राहिली. ज्या उत्तर प्रदेशवर भाजपाची सर्वाधिक भिस्त होती, तिथे समाजवादी पक्षाने ३७ जागा मिळवून तिसरा सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. तर ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने २९ जागा मिळवत चौथ्या क्रमाकांचा मोठा पक्ष होण्याचा मान मिळविला आहे. आता बहुमताचा आकडा गाठण्यात कुणाला यश येते? हे पाहावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here