सोलापूर : मंगळवेढ्यातील शेतकरी ऊस वजनकाट्याचा ‘शिरोळ पॅटर्न’ राबविणार

कोल्हापूर : शिरोळमधील आंदोलन अंकुश संघटनेने ऊस वजनातील काटामारी रोखण्यासाठी शेतकऱ्यांच्या मालकीचा वजनकाट्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. आंदोलन अंकुशच्या या उपक्रमाची राज्यात सर्वत्र दखल घेण्यात आली. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने या वजन काट्याची माहिती घेण्यासाठी शिरोळला भेट दिली. येत्या ऊस गळीत हंगामात मंगळवेढा भागात अशा प्रकारचा वजनकाटा उभा करू, अशी घोषणा मंगळवेढा शेतकरी समितीचे प्रमुख संजय कट्टे यांनी यावेळी केली.

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून राज्यात सर्वाधिक काटामारी केली जाते असे संजय कट्टे यांनी सांगितले. ही काटामारी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा त्रयस्थ वजनकाटा उभा करणे गरजेचे आहे. हे ओळखून मंगळवेढ्यातील २० हून अधिक शेतकऱ्यांनी आंदोलन अंकुशच्या शेतकरी वजनकाट्याला भेट देऊन माहिती घेतली. आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी त्यांना वजनकाटा उभारणीसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. आंदोलन अंकुशचे कृष्णा देशमुख, महेश जाधव, अमोल गावडे, एकनाथ माने, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, संजय कुट्टे, अॅड. भारत पवार, सिद्धेशवर हैम्बडे, प्रा. भगत, विजयसिंह गायकवाड, विक्रांत पंडित आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here