एफआरपी थकवली : सोलापूर जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाई

सोलापूर : जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांनी एफआरपी थकविल्याने साखर आयुक्तांनी ‘आरआरसी’ची कारवाई केली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे १८५ कोटी रुपये थकले आहेत. गाळप हंगाम घेतलेल्या ३६ पैकी २३ साखर कारखान्यांनी एफआरपीनुसार शेतकऱ्यांचे पैसे दिल्याचे साखर आयुक्तांच्या अहवालात नोंदवले गेले आहे. उर्वरित १३ साखर कारखान्यांकडे १८५ कोटी थकल्याचे दिसते. दरम्यान, काही साखर कारखान्यांनी चलाखी करत साखर आयुक्त कार्यालयाला १०० टक्क्यांपेक्षा अधिक पैसे दिल्याचे कळविले आहे.

साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी जिल्ह्यातील करमळा येथील विठ्ठल रिफायनरीने १६.२२ कोटी रुपये, गोकुळ तुळजाभवानी कारखान्याने ११.२७ कोटी, मातोश्री लक्ष्मी शुगरने २२. ५६ कोटी व आदिनाथ करमाळा कारखान्याने ६७ लाख रुपये थकवल्याने त्यांच्यावर आरआरसीची कारवाई केली आहे. दरम्यान, सोलापूर प्रादेशिक कार्यालयाचे उपसंचालक पांडुरंग साठे म्हणाले की, हंगामात गाळप केलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण पैसे न देता एफआरपीनुसार शेतकऱ्यांना पैसे दिल्याचे लक्षात आले आहे. असा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित कारखान्याला विचारणा केली आहे. ही बाब वरिष्ठ कार्यालयाला कळविण्यात येईल. तर राज्य ऊस दर नियंत्रण समितीचे सदस्य सुहास पाटील म्हणाले की, अनेक साखर कारखान्यांनी एफआरपीनुसार शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत. एक- दोन दिवसांत माहिती घेऊन आंदोलन करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here