जालना : गोपीनाथ मुंडे आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृह सुरू केली आहेत. जालना जिल्ह्यात १२ वसतिगृह सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे ऊस तोडणी कामगारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणाचा मार्ग सुकर होणार आहे. महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाकडे ३१ हजार २०९ ऊसतोड कामगारांची नोंद आहे. मागील शैक्षणिक वर्षापासून या ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी जिल्ह्यातील आंबड तालुक्यात केवळ दोन वसतिगृह होते. या वसतिगृहात मुला- मुलांसाठी प्रत्येकी १०० इतकी प्रवेश क्षमता होती. आता या नव्या वसतिगृहांमुळे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
ऊसतोड कामगारांची मुले पुन्हा शिक्षणाच्या मूळ प्रवाहात यावीत, तसेच मुलांना अर्धवट शिक्षण सोडावे लागू नये, यासाठी यंदा जिल्ह्यासह तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येकी दोन वसतिगृह सुरू करण्यास शासनाची मंजुरी मिळाली आहे. सर्व वसतिगृहाची प्रवेश क्षमता शंभर आहे. एकूण ११ वसतिगृह मंजूर झाली आहेत. त्यापैकी परतूर आणि घनसांवगी येथील वसतिगृहासाठी अद्याप इमारत मिळालेली नाही. याबाबत गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाचे जालना कार्यालयीन अधीक्षक सतीश ससाणे म्हणाले की, ऊसतोड कामगारांच्या पाल्यासाठी यंदा १२ वसतिगृह सुरु करण्यात येत आहेत. त्यापैकी जालना, आंबड, मंठा, बदनापूर तालुक्यात प्रत्येकी दोन वसतिगृह या शैक्षणिक वर्षापासून सुरु केली जाणार आहेत; परंतु घनसांवगी आणि परतूर या दोन ठिकाणी इमारत नसल्याने येथे प्रत्येकी एक वसतिगृह सुरु केले जाणार आहे. येथे जागेचा शोध सुरु आहे.