सोलापूर : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्यावतीने गेल्या दोन वर्षात चेअरमन अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आता आधुनिक पद्धतीने ऊस लागवड व या क्षेत्रातील नवतंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना व्हावी, एकरी ऊस उत्पादन वाढावे यासाठी तालुक्यातील पाच गटातील २३ गावांमध्ये ऊस पिक परिसवादांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड यांनी दिली.
याबाबत प्र. कार्यकारी संचालक गायकवाड यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि ऊस लागवड, ऊस संगोपनाची माहिती व्हावी, यासाठी गटनिहाय तज्ज्ञ, शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत ऊस पीक परिसंवादांचे आयोजन केले आहे. कौठाळी येथून याची सुरूवात झाली असून आज, शुक्रवारी उपरी, भाळवणी येथे याचे आयोजन केले आहे. स्त्रज्ञ मल्लिनाथ जट्टे, सतीश राठोड, ऊस भूषण सोमनाथ हुलगे हे तज्ज्ञ परिसंवादासाठी उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. आगामी काळात सोनके, खर्डी, तावशी, आंबे, सरकोली, चळे, सुस्ते, पटवर्धन कुरोली, नांदोरे, उंबरे, करकंब, गुरसाळे, होळे, चिंचोली भोसे, देगाव, भोसे, पांढरेवाडी आणि खेडभोसे येथे परिसंवाद होतील.