पुणे : यंदाच्या गाळप हंगामात एकूण २०७ साखर कारखान्यांनी गाळप केले असून १ हजार ७५ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले आहे. त्यासाठी तोडणी आणि वाहतूक खर्चासहित ३५ हजार ९९६ कोटी रूपयांचा एफआरपी शेतकऱ्यांना देणे अपेक्षित होते. पण त्यापैकी तोडणी आणि वाहतूक खर्चासहित ३५ हजार ४९२ कोटी रूपये कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिलेले आहेत. तर ५०४ कोटी रूपयांची रक्कम कारखान्यांकडे अजूनही बाकी आहे. राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे दिलेले नसल्याची माहिती साखर आयुक्तालयाच्या अहवालातून स्पष्ट झाली आहे.
राज्यात १४ मे रोजी गळीत हंगामाची समाप्ती झाली. खरेतर ऊस तुटून साखर कारखान्यात गेल्यानंतर १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांचे पैसे खात्यावर जमा करणे बंधनकारक असते. पण अनेक कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे पैसे थकीत आहेत. एफआरपीच्या ९८.६० टक्के रक्कम कारखान्यांनी दिली आहे. २०७ साखर कारखान्यांपैकी ५३ साखर कारखान्यांनी अजून पूर्ण एफआरपी दिलेली नाही. १५४ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना पूर्ण रक्कम दिली आहे. सध्या ७ साखर कारखान्यांवर आरआरसीची कारवाई केली आहे.