नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृ्त्वाखालील एनडीए आघाडीच्या सरकारमध्ये पहिल्यांदाच शिवराज सिंह चौहान यांच्याकडे १० जून रोजी कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्रालय सोपविण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील प्रमुख भाजप नेते आणि चारवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या चौहान यांना राज्यात ‘मामाजी’ या नावाने ओळखले जाते. नऊ जून रोजी त्यांनी केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
अनुभवी राजकारणी असलेल्या चौहान यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करणे ही एनडीए आघाडी सरकारमधील धोरणात्मक वाटचाल आहे. गेल्या वर्षी मध्य प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या शानदार विजयानंतर मोहन यादव यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर चौहान यांचा राजकीय प्रवास अचानक थांबला. तथापि, त्यांनी १९९१ ते २००४ पर्यंत प्रतिनिधित्व केलेल्या विदिशा येथून लोकसभा निवडणूक लढवली. जवळपास आठ लाखांहून अधिक मताधिक्क्याने विजयी होऊन त्यांनी नवी दिल्लीच्या राजकारणात शानदार पुनरागमन केले.