पेशावर : पाकिस्तानमध्ये साखरेचा काळाबाजार रोखण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरून सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल अशा दरात साखर उपलब्ध होऊ शकेल. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या दर नियंत्रण तपासणी पथकाने मट्टाणी परिसरात सरकारी दराचे उल्लंघन करून काळ्या बाजारात विक्री केली जाणारी ८०० पोती साखर मंगळवारी जप्त केली. तपासणीनंतर काळ्या बाजारात साखर विक्री केल्याप्रकरणी गोदाम मालकाला अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी ही साखर पोती जप्त करून त्यांचे खुल्या बाजारात विक्री करण्याचे आदेश दिले.
सर्वसामान्य नागरिकांना सरकारी दराने साखर उपलब्ध करून देणे आणि साठवणूक व काळाबाजार रोखणे हा तपासणीचा उद्देश आहे. दुकानांमध्ये जास्त दर मागितल्यास किंवा शासकीय दराच्या नियमांचे पालन न केल्यास जिल्हा प्रशासन नियंत्रण कक्षाच्या ०९१९२११३३८ या क्रमांकावर माहिती देण्याच्या सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने दुकानदार व व्यापाऱ्यांना शासकीय दर यादी प्रदर्शित करून ठरलेल्या दराने साखर विक्री करण्याचा इशारा दिला आहे.