बेळगाव : कर्नाटकात यंदा ५२.६० लाख टन साखर उत्पादन झाले असून ते गतवर्षीपेक्षा सात लाख टनांनी कमी आहे. कमी पावसामुळे साखर उत्पादनात सुमारे १५ टक्के घट झाली आहे. गेल्यावर्षी राज्यात ५९.८० लाख टन उत्पादन झाले होते. गेल्यावर्षी सरासरीपेक्षा फार कमी पाऊस झाला होता. त्यामुळे, उसाच्या लागवडीवर परिणाम होऊन उत्पादनही कमी झाले होते. त्याचा परिणाम गाळप व साखर उत्पादनावर झाला आहे.
यंदा देशात ३१६.७० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. उसाचे गाळप गतवर्षीच्या तुलनेत १७९ लाख टनांनी कमी आहे. परिणामी साखरेचे उत्पादनही गेल्या वर्षीच्या तुलनेत १० लाख टनांनी घटले आहे. राज्याचा विचार करता, कर्नाटकचा देशातील साखर उत्पादनात तिसरा क्रमांक आहे. राज्यात १५ एप्रिलपर्यंत ५०.६ लाख टन साखर उत्पादन झाले होते. पुढील दीड महिन्यांत २.५४ लाख टन साखर उत्पादन झाले. तर बेळगाव जिल्ह्यातील २८ साखर कारखान्यांतून यंदा सरासरी साखर उतारा अधिक मिळाला असून तो गेल्यावर्षीपेक्षा ०.२६ टक्क्याने जास्त आहे. राज्यात बेळगाव जिल्हा साखर उत्पादनात अव्वल आहे. दरम्यान, आगामी हंगामात साखर उत्पादन वाढणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.