कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील अथर्व – दौलत साखर कारखाना बंद पाडण्यासाठी राजकीय कटकारस्थाने सुरू आहेत असा आरोप अथर्व उद्योगसमुहाचे प्रमुख मानसिंगराव खोराटे यांनी केला.चंदगड येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कारखान्याबाबत काही गोष्टी भविष्यात अडचणीच्या होत्या, त्या मी शेतकरी, सभासदांपर्यंत निदर्शनास आणल्या. याबाबत गोपाळराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन फौजदारी खटले दाखल करणार असल्याचे सांगितले. त्याला आम्ही सक्षम आहोत असेही त्यांनी सांगितले.
मानसिंग खोराटे म्हणाले की, कारखान्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडे असणाऱ्या पैशावर दौलत किंवा अथर्वचा हक्क नसून केवळ शेतकऱ्यांचा हक्क आहे. या पैशासाठी कोर्टात प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी अथर्व कंपनीचा पैसा खर्च होत आहे. शेतकऱ्यांचे पैसे मी मिळवून देणार, याचे राजकारण कुणी करू नये. कारखान्याची २२३ एकर जागा आहे.पार्टिकल बोर्डची ५-६ एकर वगळता बाकी जमीन ३९ वर्षांसाठी अथर्व कंपनीच्या ताब्यात आहे. तेथे तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे तिथे कोणताच हस्तक्षेप केला नाही. फॅक्टरीच्या उपलब्ध जागेत केवळ शैक्षणिक सोयीसाठी उपलब्ध करून देऊ, राजकारणासाठी नाही, असे खोराटे यांनी स्पष्ट केले. यावेळी अश्रू लाड, शिवाजी पाटील, मोहन पाटील, नारायण पाटील, अनिल होडगे, बाळाराम फडके, सतीश सबनीस, सुरेश कुट्रे, संजय फडके आदी उपस्थित होते.