पुणे : साखर आयुक्तालयाने केंद्र सरकार पुरस्कृत राष्ट्रीय कृषी विकास योजना ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेत ३७२ अर्जदार लाभार्थ्यांना यंत्र खरेदीची पूर्वसंमती दिलेली आहे. त्यातील ८० यंत्रांसाठी बँक कर्ज मंजुरी प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यापैकी बहुतांश यंत्रांची खरेदी झालेली आहे. उर्वरित ऊस तोडणी यंत्रांची खरेदीची प्रक्रिया गतीने सुरू आहे. यासाठीची मुदत ३१ जुलै आहे. राज्यात योजनेनुसार पूर्वसंमती दिलेल्या ३७२ ऊसतोडणी यंत्रांची खरेदी वेळेत झाल्यास तेवढी तोडणी यंत्रांची उपलब्धता वाढणार आहे.
गतवर्षीच्या २०२३-२४ च्या ऊसतोडणी हंगामात एक जार २७१ ऊस तोडणी यंत्राद्वारे उसाची तोडणी झालेली आहे. त्यामुळे पूर्वसंमती दिलेल्या यंत्रांच्या खरेदीनंतर ही संख्या एक हजार ६४३ होईल. आरकेव्हीवाय योजना कृषी व कृषी संलग्न विभागामार्फत अनेक प्रकल्प राबविले जातात. त्याअंतर्गत सहकार व पणन विभागामार्फत साखर आयुक्तालयाकडून ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना राबविली जात आहे. योजनेतून दोन वर्ष कालावधीत ९०० ऊस तोडणी यंत्र खरेदीवर खरेदी किंमतीच्या ४० टक्के अथवा ३५ लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम अनुदान स्वरुपात देण्याचा शासन निर्णय आहे.