नवी दिल्ली : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आगामी खरीप हंगामासाठी खते, बियाणे आणि कीटकनाशकांची वेळेवर उपलब्धता सुनिश्चित करण्याची गरज व्यक्त केली आहे. कृषी भवनात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत खरीप हंगाम २०२४ च्या तयारीचा आढावा त्यांनी घेतला.यावेळी चौहान यांनी पिकांसाठी निविष्ठा सामग्रीचे वेळेवर वितरण आणि दर्जेदार पुरवठा सुनिश्चित करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी खत विभाग, केंद्रीय जल आयोग आणि भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव मनोज आहुजा आणि मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्र्यांना खरीप हंगामाच्या तयारीची माहिती दिली. कृषी मंत्री चौहान म्हणाले की, पुरवठा साखळीतील कोणत्याही व्यत्ययामुळे पेरणीला विलंब होतो. यामुळे उत्पादनात व्यत्यय येतो. ते कोणत्याही परिस्थितीत टाळले पाहिजे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी चौहान यांनी संबंधित विभागाला सतत देखरेख आणि परिस्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश दिले.यंदाच्या हंगामाबाबत ते म्हणाले की, यंदा नैऋत्य मोसमी पावसाचा अंदाज नेहमीपेक्षा चांगला आहे.
तत्पूर्वी, कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाच्या (डीएआरई) कामकाजाचा आढावा घेताना, शिवराज सिंह चौहान यांनी कृषी उत्पादकता सुधारण्यासाठी शेतात यांत्रिकीकरण वाढविण्याचे आवाहन केले. कृषी शिक्षणाला व्यवसायाशी जोडण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.त्यांनी किसान विकास केंद्रांची (KVKs) उपयुक्तता सुधारण्यासाठी सखोल चर्चा करण्यावर भर दिला.तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडू शकते, असे ते म्हणाले. त्यांनी शास्त्रज्ञांना उत्पादकता सुधारण्यासाठी आणि नवीन जाती विकसित करण्यासाठी सतत काम करण्याचे आवाहन केले.
चौहान म्हणाले की, नैसर्गिक शेती पद्धती सुलभ करण्याची गरज आहे.कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव आणि भारतीय कृषी संशोधन केंद्र (आयसीएआर)चे महासंचालक हिमांशू पाठक यांनी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्र्यांना भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर)उपक्रम आणि १०० दिवसांच्या योजनेची माहिती दिली. आयसीएआरने १०० दिवसांच्या योजनेमध्ये शंभर पीक जातींचा विकास आणि शंभर नवीन तंत्रज्ञानाचे प्रमाणीकरण याचा समावेश केल्याचे ते म्हणाले.बैठकींना कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर आणि भगीरथ चौधरी हेही उपस्थित होते.