शिमोगा : येथे २४ जून रोजी कृषी क्षेत्रातील विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी आणि कृषी क्षेत्रातील संकटावर मात करण्यासाठी शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेत विविध राज्यस्तरीय नेते सहभागी होऊन कृषी उद्योगाशी संबंधित विषयांवर चर्चा करणार आहेत. राज्य ऊस उत्पादक संघाचे(State Sugarcane Cultivators Association) अध्यक्ष कुरुबुर शांताकुमार यांनी मंगळवारी ही माहिती दिली. कृषी विमा अधिकाधिक शेतकरीपूरक बनावा, यासाठी परिषदेत कृषी विम्यामध्ये बदल करण्याची गरज यावर चर्चा केली जाईल, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यावेळी साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार डिजिटायझेशन करण्याचे आवाहन करून शांताकुमार म्हणाले की, गाळप केलेल्या उसाची साखरेचा उतारा आणि ज्या शेतकऱ्यांकडून पीक खरेदी केले आहे, त्यांना किती रक्कम अदा करण्यात आली आहे, यात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने साखर कारखानदारांना सूचना दिल्या पाहिजेत. सध्या कारखान्यांमध्ये गाळप केलेल्या उसाच्या प्रती टन साखरेच्या उताऱ्याबाबत स्पष्टता नाही. यासाठी एक ॲप आधीच विकसित केले गेले आहे आणि त्याची निवड करण्याच्या सूचना कारखानदारांना द्यायला हव्यात, असे ते म्हणाले.
दरम्यान, साखर कारखानदारांकडून शेतकऱ्यांना त्यांची बिले वेळेवर दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.युनायटेड किसान मोर्चा अंतर्गत उत्तर भारतातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा बळकट आणि व्यापक करण्यासाठीही या परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.