छत्रपती संभाजीनगर :सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या जमिनीची अखेर नवव्या फेरीत लिलाव प्रक्रिया झाली.तहसील कार्यालयात बुधवारी ६ कोटी ५० लाख १६ हजार रुपयांत बोली पद्धतीने जमिन विक्री करण्यात आली.आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना उपदानाची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र देणी लिलावपोटी मिळणारी रक्कम यात अजुनही १ कोटी ९० लाख रुपयांची तफावत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना सध्या तरी पूर्ण रक्कम मिळण्याची शक्यता कमीच आहे. यापूर्वी आठ वेळा निविदा काढूनही जमिनीचा लिलाव न झाल्याने सेवानिवृत्त कर्मचारी अडचणीत सापडलेले होते.
निवृत्त कर्मचारी उपदानाबद्दल न्यायालयाने निकाल देऊनही जमीन घेण्यास कुणी पुढे न आल्याने सेवानिवृत्त कर्मचारी पुन्हा न्यायालयात गेले होते. यानंतर न्यायालयाने कारखान्याची डिस्टीलरी सील करुन तात्काळ वसुली करण्याचे आदेश दिले होते. या अनुषंगाने तहसीलदार रुपेश खांडरे, नायब तहसीलदार प्रभाकर गवळी, तलाठी शीतल झिरपे, दुर्गेश गिरी यांनी डिस्टीलरी पाहणी केली होती. तर कारखान्याच्या मालकीचा एक ट्रक, एक जीप व एक ट्रॅक्टर ११ जूनला जागेवर जप्त केला होता. कारखान्याच्या १०५ सेवानिवृत्त कर्मचारी उपदानाची रक्कम मिळावी म्हणून न्यायालयात गेले होते. उपदानाचे ८ कोटी ३९ लाख रुपये अदा करावे, असे आदेश न्यायालयाने दिलेले होते. दरम्यान, कारखाना पुढेही चालावा यासाठी जप्तीची कारवाई होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्नशील होतो. पुढेही कारखाना चालावा म्हणून आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करु, असे चेअरमन ज्ञानेश्वर मोठे यांनी सांगितले.