बेळगाव :अखिल कर्नाटक ऊस उत्पादक शेतकरी संघटनेने थकीत ऊस बिलप्रश्नी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन केले.उसाची बिले थकविलेल्या कारखानदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.शेतकऱ्यांनी दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन केले.अनेक कारखान्यांनी ऊस पुरवठा करूनही कारखान्यांनी उसाचे बिल थकविले आहे.यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.थकीत बिल त्वरित द्यावे,अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करून पाच ते सहा महिन्यांचा कालावधी उलटला आहे.हंगाम संपला तरी कारखान्यांनी उसाची बिले अदा केलेली नाहीत.त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.केवळ आश्वासने दिली जात आहेत. त्यामुळे शेतकरी कंगाल झाला आहे.त्वरित थकीत बिले देण्यात यावीत, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली.कायद्यानुसार ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना १४ दिवसांत बिले देणे बंधनकारक आहे.मात्र, कारखानदार टाळाटाळ करीत आहेत.त्यामुळे प्रशासनने साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींची व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संयुक्त बैठक बोलवावी, अशी मागणी करण्यात आली.