‘बिद्री’ कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पाची राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तपासणी

कोल्हापूर : कागल तालुक्यातील बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पाची राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अचानक तपासणी करण्यात आली. विशेष पथकाने शुक्रवारी, २२ जून रोजी रात्री दहाच्या सुमारास कारखाना कार्यस्थळावर डिस्टलरी प्रकल्पाच्या कामाची तसेच मान्यतेच्या कागदपत्रांची तपासणी केली. शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ही चौकशी सुरु होती.

बिद्री साखर कारखान्याच्या प्रतिदिन साठ हजार केएलपीडी क्षमतेच्या डिस्टलरी प्रकल्पाची उभारणी सुरु आहे. सुमारे १३० कोटी रुपयांचा हा प्रकल्प सुरवातीपासूनच सत्ताधारी व विरोधी गटाच्या आरोप-प्रत्यारोपांनी चर्चेत आहे. कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील व राधानगरी-भुदरगडचे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांच्यात या प्रकल्पावरुन अनेकवेळा आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडल्या आहेत.

नुकत्याच ‘बिद्री’चे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी खासदार शाहू महाराज व आमदार सतेज पाटील यांचे जोरदार स्वागत केले होते. यामुळे के. पी. पाटील हे महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. या चर्चा सुरु असतानाच शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी डिस्टलरी प्रकल्पावर धाड टाकून तपासणी केली. यावेळी प्रकल्पाला मिळालेल्या विविध परवानग्या आणि प्रत्यक्ष झालेल्या कामाची अधिकाऱ्यांनी पडताळणी केल्याचे समजते. कारखान्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पथकाला आवश्यक ती माहिती दिली. शनिवारी सकाळी आठच्या सुमारास ही तपासणी पूर्ण झाली.

बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील म्हणाले कि, कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन त्याची उत्पादन चाचणी सुरु आहे. पण काल उत्पादन शुल्कच्या पथकाने प्रकल्पाला अचानक भेट देऊन तपासणी केली. याचा अहवाल ते आपल्या वरिष्ठांना देतील. हा अहवाल आपल्याला मिळाल्यानंतर त्याबाबत योग्य तो खुलासा करण्यास कारखाना प्रशासन सक्षम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here