ऊस तोडणी कामगारांच्या पाल्यांचे वसतिगृह प्रवेश लवकर पूर्ण करा: जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

लातूर:संत भगवानबाबा शासकीय वसतीगृह योजनेंतर्गत जिल्ह्यात ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी प्रत्येकी दोन अशी चार वसतिगृहे मंजूर आहेत.या वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया गतीने पूर्ण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केली.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित समाज कल्याण विभागाच्या विविध समित्यांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.स्थलांतरीत ऊसतोड कामगारांच्या मुलांचे शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी शासनाने वसतीगृहे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.शिक्षण विभाग आणि समाज कल्याण विभागाने तातडीने ऊसतोड कामगार आणि त्यांच्या पाल्यांची माहिती संकलित करून नोंदणी करावी असे त्यांनी सांगितले.

या बैठकीला समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते, जिल्हा पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर,समाज कल्याण अधिकारी संतोष कुमार नाईकवाडी, लातूर शहर महानगरपालिकेचे उपायुक्त शुभम क्यातमवार, जिल्हा विशेष शाखेचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एम.एम.पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे डॉ.कलमे आदी यावेळी उपस्थित होते.समाज कल्याण सहायक आयुक्त चिकुर्ते यांनी माहितीचे सादरीकरण केले.कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून वयोवृद्ध नागरिकांना आरोग्य सुविधा, विरंगुळा केंद्राची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here