राज्यात १ जुलैपासून शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनास सुरुवात : राजू शेट्टी यांची घोषणा

कोल्हापूर : छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे १०० व ५० रुपयाचा दुसरा हप्ता देण्याची राज्य सरकार व साखर कारखानदार यांना सद्बुद्धी मिळावी तसेच शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावे यासाठी शाहू महाराजांचे जनकस्थळ कागल ते समाधीस्थळ कोल्हापूरपर्यंत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करून कैफियत पदयात्रा काढण्यात आली.

‘स्वाभिमानी’च्यावतीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ऊस उत्पादक प्रश्नावर राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन केले होते.उसाला तीन हजार रुपयांपेक्षा अधिक दर दिलेल्या शेतकऱ्यांना १०० रुपये प्रति टन मिळावेत तसेच तीन हजारापेक्षा कमी पैसे दिलेल्याना ५० रुपये द्यावेत ही मागणी होती.जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी तशी हमी जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती.मात्र अजूनही प्रशासन व सरकार या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.त्याबरोबरच पवना ते गोवा हा शक्तीपीठ महामार्ग कुणाचीही मागणी नसताना शेतक-यांच्या मुळावर उठणारा व सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो गावांना महापुराचा वेढा वाढविणारा हा महामार्ग रद्द करावा, या मागण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात आली.

यावेळी शाहू समाधी स्थळ ठिकाणी राजू शेट्टी म्हणाले की, राज्यकर्त्यांना शाहू महाराजांची जयंती साजरी करण्याचा नैतिक अधिकार आहे का याच आत्मचिंतन करावं.प्रत्येक पावला पावलावर राज्यकर्ते सामान्य जनता व शेतक-यांना फसवू व लुबाडू लागले आहेत.शक्तीपीठच्या माध्यमातून शेतक-यांच्या जमीनी कवडीमोल दराने विकण्यासाठी वाकड्या नजरेने जरी बघाल तर डोळे काढून हातात दिले जातील असा सज्जड इशारा राज्यकर्त्यांना दिला.राज्यात हरितक्रांती घडविणारे वसंतराव नाईक यांच्या जिल्ह्यातून १ जुलैपासून शेतकरी कर्जमुकती आंदोलनास सुरवात करणार असून राज्यभर हे आंदोलन केले जाणार आहे. या पदयात्रेस सकाळी ९ वाजता कागलच्या गैबी चौकातून पदयात्रेस सुरवात केली. २२ किलोमीटरची ही पदयात्रा कागल-पुणे महामार्गावरून शिवाजी विद्यापीठ ,सायबर चौक , शाहू मिल , पार्वती टॅाकीज, गोकुळ हॅाटेल, व्हीनस कॅार्नर, दसरा चौक ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे समाधिस्थळ ठिकाणी सायंकाळी ५ वाजता पोहचली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here