कोल्हापूर : कसबा बावडा येथील राजाराम साखर कारखान्याकडे प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांची सोडवणूक व्हावी, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या शिष्टमंडळाने दिला आहे. गुरुवारी कारखान्याच्या चेअरमन यांना निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ गेले होते. मात्र, पोलिसांनी या शिष्टमंडळाला मुख्य प्रवेशद्वारावरच अडवले. त्यामुळे शिष्टमंडळाने निवेदन न देता कारखाना प्रशासनाचा निषेध केला. आता कायदेशीर मार्गाने पुढची लढाई लढू, असा इशारा मोहन सालपे यांनी यावेळी दिला. मागण्यांची प्रत पुणे साखर आयुक्त आणि येथील प्रादेशिक सहसंचालकांना देण्यात आली आहे.
याबाबत राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीने पत्रक प्रसिद्धीस देऊन आपली भूमिका मांडली आहे. प्रलंबित मागण्यांची सोडवणूक कारखान्याने एक महिन्यात केली नाही, तर तीव्र आंदोलन करू. कायदेशीर लढाई लढली जाईल, असा इशारा सालपे यांनी दिला आहे. यावेळी शशिकांत खवरे, अभिजित माने, श्रीराम सोसायटीचे उपसभापती दत्तात्रय मासाळ, धनाजी गोडसे आदी उपस्थित होते. दरम्यान, कारखान्याचे चेअरमन अमल महाडिक यांनी सांगितले की, मी कारखान्यावर शिष्टमंडळाचे निवेदन घेण्यासाठी वेळेपूर्वी आलो होतो. बराच वेळ शिष्टमंडळाची वाट बघितली. मात्र, यापूर्वी झालेल्या अनुचित प्रकारामुळे पोलिस कारखान्यावर आले. त्यांनी शिष्टमंडळाला दहा सभासद शेतकऱ्यांनी जावून निवेदन द्यावे अशी विनंती केली. पण, ती मान्य न करताच विरोधक परतले.