कोल्हापूर:बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टिलरीवरील कारवाई तत्काळ मागे घ्या, अन्यथा शेतकरी-सभासद राज्य सरकारविरोधात तीव्र आंदोलन करतील, असा इशारा कारखान्याच्या सभासद, शेतकऱ्यांनी दिला.शुक्रवारी सभासद शेतकऱ्यांनी करवीर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला.उत्पादन शुल्क विभागाने डिस्टिलरी प्रकल्पाच्या उत्पादन व विक्री या दोन्ही परवाने निलंबित करण्याचीही कारवाई करण्यात आली.परिणामी, डिस्टिलरी प्रकल्पाकडे उपलब्ध असलेल्या रेक्टिफाईड स्पिरीटची विक्री थांबली आहे.यामुळे कारखान्याचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. कारखाना मोडीत काढून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा कुटील डाव विरोधकांकडून सुरू असल्याचा आरोपही तहसीलदार स्वप्निल रावडे यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने दि.२१ रोजी अचानक धाड टाकून बिद्री साखर कारखान्याच्या डिस्टिलरीची तपासणी सुरू केली.दि.२२ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती.त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी सकाळी ११ वाजल्यापासूनच सभासद शेतकरी जिल्हा बँकेच्या आवारात एकत्र आले. दुपारी १२ वाजता करवीर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.तहसील कार्यालयासमोर नेकांनी बिद्री डिस्टिलरी प्रकल्पावरील कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला.बच्चाराम किल्लेदार, डॉ.बाबासाहेब पाटील, श्रीपती पाटील, पांडुरंग पाटील, पांडुरंग मगदूम, एकनाथ पाटील, गजानन पाटील, एस.के.पाटील, बजरंग पाटील, महेश मगदूम, पप्पू पाटील, अमर पारळे आदी मोर्चात सहभागी झाले होते.करवीर तहसीलदारांसह उत्पादन शुल्क विभागालाही हे निवेदन देण्यात आले.