कोल्हापूर:शिरोळ येथील श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये प्रचाराला अवघ्या चार दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.या चार दिवसांत ११५ गावांतील सभासदांपर्यंत पोहोचणे अशक्य आहे.त्यामुळे प्रसिद्ध झालेला निवडणूक कार्यक्रम सुधारित जाहीर करावा, अशी मागणी आंदोलन अंकुश संघटनेने केली आहे.याबाबत जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आले आहे.दरम्यान, सध्या चेअरमन व संचालक हे कारखान्यातून निवडणुकीबाबत कामकाज करत आहेत.त्यांचे कामकाज थांबवावे.त्यांना कारखान्याची वाहने वापरण्यावर बंदी घालण्याची मागणीही संघटनेने केली आहे.
दत्त कारखान्याच्या निवडणूक कार्यक्रमानुसार, उमेदवारांना चिन्ह वाटप २० जुलैला होणार असून, मतदान २४ जुलै रोजी होणार आहे.त्यामुळे चार दिवसांत ११५ गावांत प्रचार होणे अशक्य आहे.कारखान्याचे ४२ हजार सभासद असून, ते दोन राज्यांतील ५ तालुक्यांत आहेत.सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी किमान १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे.प्रचार कालावधी वाढवून पुन्हा नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.धनाजी चुडमुंगे दीपक पाटील, राकेश जगदाळे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन दिले आहे.कारखान्याचे चेअरमन, संचालकांकडील वाहने काढून घेण्याची मागणी दीपक पाटील, अलका माने, संभाजी माने, राकेश जगदाळे यांच्यासह सभासदांनी केली आहे.