पुणे:शिरूर तालुक्यातील रावसाहेबदादा घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला अतिशय सवलतीमध्ये मिळणाऱ्या राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाच्या(एनसीडीसी)कर्जापासून वंचित ठेवण्यात आले आहे. कारखान्याचे सर्वेसर्वा तथा माजी अध्यक्ष आमदार अशोक पवार हे शरद पवारांच्या गटामध्ये असल्यामुळे कारखान्याला कर्जापासून वंचित ठेवले जात आहे, असे चित्र आहे.या राजकीय साठमारीत सभासदांचे मात्र अतोनात नुकसान होत आहे.
राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाने राज्यातील अडचणीतील १३ सहकारी साखर कारखान्यांना सुमारे १८९८ कोटी रुपयांचे कर्ज नुकतेच मंजूर केले.राज्य सरकारने या कर्जाला हमी दिली आहे. त्यामुळे हे कारखाने आर्थिक अडचणीतून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला.यातील बहुसंख्य कारखाने सत्ताधारी पक्षातील नेत्यांचे आहेत.आमदार अशोक पवार हे कारखान्याच्या कर्ज प्रस्ताव मंजुरीसाठी प्रयत्न करत असताना कारखान्याच्या १६० कोटी रुपयांच्या कर्ज प्रस्तावात अनेक त्रुटी काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे सभासदांमध्ये अस्वस्थता आहे.