कोल्हापूर:सोनवडे- बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील उदयसिंगराव गायकवाड सहकारी साखर कारखान्याच्या कामकाजाबाबत झालेल्या तक्रारीवर शुक्रवारी (दि.५) प्रादेशिक साखर सहसंचालकांच्या समोर सुनावणी होणार आहे.गेल्या आठवड्यातील सुनावणी कारखान्याच्यावतीने कोणी हजर न झाल्याने लांबणीवर टाकण्यात आली.कारखान्याचे सभासद व बाजार समितीचे माजी उपसभापती शंकर पाटील यांनी कारखान्यात गेल्या पंधरा वर्षांत बेकायदेशीर कामकाज झाले आहे.कारखाना ३० वर्षाच्या दीर्घ मुदतीने एका खासगी कंपनीला दिला आहे.बेकायदेशीर कामकाजाची चौकशी करून संचालक मंडळावर कलम ८८ नुसार जबाबदारी निश्चित करा, अशी मागणी साखर आयुक्तांकडे केली आहे.
साखर आयुक्तांनी या तक्रारीची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार प्रादेशिक साखर सहसंचालक गोपाल मावळे यांनी याबाबत संबंधितांना नोटीस काढून म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.याबाबत गेल्या आठवड्यात सुनावणी होती. पण, कारखान्याच्यावतीने कोणी हजर राहिले नसल्याने सुनावणी लांबणीवर टाकण्यात आली.आता शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.