भुदरगड साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

कोल्हापूर : राज्य उत्पादन विभागाने बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टीलरीवर केलेल्या कारवाईनंतर आता कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील विरुद्ध आ. प्रकाश आबिटकर यांच्यातील राजकीय युद्ध सुरू झाले आहे. यादरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार आबिटकर यांना भुदरगड साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनाचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या माध्यमातून आमदार आबिटकर हे माजी आमदार के. पी. पाटील यांना आव्हान देऊ शकतात.

‘पुढारी’मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, माजी आमदार शंकरराव धोंडी पाटील यांनी या कारखान्याची नोंदणी केल्याचे सांगण्यात येते. नंतर भुदरगड नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून भुदरगड येथे साखर कारखाना काढण्याचे ठरविण्यात आले. मात्र पतसंस्थेच्या अडचणीनंतर कारखान्याचे स्वप्न तसेच राहिले. भास्कर ठाकूर यांच्या पुढाकाराने हा कारखाना सुरू करण्याचे नियोजन होते. आता प्रकाश अबिटकर यांनी नव्याने भुदरगड तालुका सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारखान्याला शासकीय भागभांडवलासह इतर मान्यता देऊन सर्व तरतुदी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. या माध्यमातून शिंदे शिवसेनेचा साखर कारखानदारीत थेट प्रवेशाचा मार्ग खुला होईल. कारखान्यास १५० एकर जागा आणि ७५ लाख रुपयांचे भागभांडवलही पूर्वी देण्यात आल्याचे सांगण्यात येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here