सातारा : ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करुन अद्यावत हवामान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाधावर तंत्रज्ञान पोहचवण्यासाठी जिल्हा बँकेने पुढाकार घेतला आहे. यासाठी जिल्ह्यातील ५० शेतकऱ्यांची या उपक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. अद्ययावत कृत्रिम बुध्दीमत्तेच्या माध्यमातून आडसाली ऊस उत्पादन वाढीसाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, मायक्रोसॉफ्ट, पायलट यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम राबवण्यात येणार आहे. यासंदर्भात नुकतेच बँकेच्या मुख्य कार्यालयात प्रशिक्षण कार्यशाळा झाली.
यावेळी अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट (बारामती) चे डॉ. विवेक भोईटे यांनी माती व पाणी परिक्षणाचे यांचे महत्व व जमिनीची सुपिकता टिकवून ठेवण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. प्रकल्प संचालक तुषार जाधव यांनी अद्ययावत हवामान केंद्राच्या माध्यमातून आडसाली ऊस लागवडीचे लागणीपासून ते तोडणीपर्यंतच्या प्रक्रियेचे सादरीकरण पॉवर पॉईंट प्रेंझेंटेशनमधून केले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी नवतंत्राच्या वापराने ऊस उत्पादनात ३० ते ४० टक्के वाढ अपेक्षित असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी ऊस उत्पादन वाढवणाऱ्या या प्रकल्पासाठी बँकेच्यावतीने संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे सागितले. उपाध्यक्ष अनिल देसाई, जेष्ठ संचालक प्रदीप विधाते, देसाई, जेष्ठ संचालक प्रदीप विधाते, दत्ता ढमाळ, राजेंद्रशेठ राजपुरे, रामराव लेंभे, सुनील खत्री, सुरेश सावंत, लहुराज जाधव, महिला संचालिका ऋतुजा पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, बँकेचे सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे उपस्थित होते. प्रदीप विधाते यांनी आभार मानले.