कोल्हापूर : दत्त सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची आजपासून रणधुमाळी

कोल्हापूर : कर्नाटक व महाराष्ट्र राज्यात ७ तालुक्यातील ११५ गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या शिरोळ येथील दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज, बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील मोठा साखर कारखाना म्हणून शिरोळ दत्त कारखान्याची ओळख आहे. स्व. माजी आ. सा. रे. पाटील यांच्या निधनानंतर दत्त कारखान्याची ही दुसरी निवडणूक होत आहे. सत्तारुढ चेअरमन गणपतराव पाटील आणि आंदोलन अंकुश संघटना या पॅनलमध्ये लढत होईल, असे चित्र दिसते.

कारखान्याच्या निवडणुकीत मंगळवार (दि. १६) जुलैपर्यंत ही मुदत असणार आहे. चेअरमन गणपतराव पाटील यांनी कारखान्याच्या माध्यमातून क्षारपड मुक्तीचे काम यशस्वी केले आहे. दुसरीकडे कारखान्यात गैर कारभार सुरू असल्याचा आरोप करत आंदोलन अंकुशकडून पॅनेल उभारले जात आहे. सा. रे. पाटील यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र गणपतराव पाटील यांनी कारखान्याची धुरा सांभाळली आहे. गत निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली श्री दत्त शेतकरी पॅनेलने एकतर्फी विजय मिळवला होता. तर विरोधी पॅनेल पृथ्वीराज यादव यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचा धुव्वा उडाला होता.

मतदान २४ जुलैला होणार आहे. यात २१ जागा निवडून द्यावयाच्या आहेत. शिवाय ११५ गावातील २ राज्यात कार्यक्षेत्र असताना निवडणूक विभागाने प्रचारासाठी फक्त ४ दिवसांचा कालावधी दिला आहे. यावरून विरोधकांकडून मोठा गाजावाजा केला जात आहे. याबाबत तक्रारी जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केल्या आहेत. चेअरमन गणपतराव पाटील यांनी कार्यक्षेत्रातील अनेक गावात क्षारपड मुक्तीचे काम यशस्वीपणे राबवले आहे. त्यामुळे दत्तचा क्षारपड मुक्तीचा पॅटर्न राज्याबाहेर आदर्श ठरत आहे. दुसरीकडे त्यांच्या कारभारावर आक्षेप नोंदवत आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी निवडणुकीत पॅनेल उभारण्याचे नियोजन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here