धाराशिव : काही शेतकऱ्यांना श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२३ -२४ मधील पैसे दिले नसल्याने शेतकरी संघटनेने माजी दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या घरावर मोर्चा काढला. सोमवारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरविंद घोडके व सुरज बचाटे यांच्या नेतृत्वाखाली येथील बसस्थानकापासून मुख्य रस्त्यावरून उसाचे पैसे मिळालेच पाहिजे, अशी घोषणाबाजी करत हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकाशी चर्चा करताना चव्हाण यांनी येत्या पंधरा दिवसात सर्व पैसे दिले जातील, असे सांगितले.
चव्हाण यांचे सुपुत्र सुनील चव्हाण यांनी करारावर हा कारखाना घेतला असून तेच चेअरमन आहेत. हा मोर्चा चव्हाण यांच्या घरासमोर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. यावेळी शेतकरी संघटनेचे चार प्रतिनिधी चर्चा करण्यासाठी चव्हाण यांच्या घरात गेले. मात्र चव्हाण हे स्वतः आंदोलकाशी चर्चा करण्यासाठी घराबाहेर आले. यावेळी ते म्हणाले की, माझी दोन्ही मुले आजारी आहेत. दोन दिवसापूर्वीच सर्व शेतकऱ्यांचे थकीत बील येत्या पंधरा दिवसात देणार असल्याचे सोशल मीडिया व वृत्तपत्रातून जाहीर केले आहे. तरीही हा मोर्चा कशासाठी काढला? घोषणा देत काढलेला हा मोर्चा अपमानास्पद आहे. गेल्या पन्नास वर्षात असे घडलेले नाही. येत्या पंधरा दिवसात सर्व पैसे दिले जातील.