लखनऊ : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यवार चर्चा सुरू केली आहे. त्याअंतर्गत नवी दिल्लीत कृषी भवनात या राज्यांच्या कृषी मंत्र्यांची बैठक झाली. उत्तर प्रदेशचे कृषी मंत्री सूर्य प्रताप शाही आणि मध्य प्रदेशचे कृषी मंत्री अदल सिंह कंसाना यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय शिष्टमंडळाने आपापल्या राज्यातील कृषी क्षेत्राच्या समस्यांवर चर्चा केली.
यावेळी केंद्रीय मंत्री चौहान म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि कृषी क्षेत्राचे हित सर्वोच्च आहे. केंद्र सरकार राज्यांना सर्वतोपरी मदत करत राहील. दरम्यान, बैठकीत पिकांच्या विविधीकरणाला चालना, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, डिजिटल पीक सर्वेक्षण, शेतकरी नोंदणी, ई-नाम, शेतकरी उत्पादक संघटना मजबूत करणे, प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि कृषी यांत्रिकीकरण आदींसह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. चौहान म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये पीक वैविध्य आणि नैसर्गिक शेतीला चालना देण्याची अपार क्षमता आहे. मध्य प्रदेशसह सर्व राज्यांमध्ये उडीद, मसूर यांच्या १०० टक्के खरेदीसाठी केंद्र वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. या बैठकीत कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव संजीव चोप्रा आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गेल्या महिन्यात केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यापासून, चौहान यांनी त्यांच्या मंत्रालयांशी संबंधित समस्यांवर तपशीलवार चर्चा करण्यासाठी आणि त्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी राज्यमंत्र्यांसोबत बैठकांची मालिका सुरू केली आहे. गेल्या महिन्यात त्यांनी आसाम आणि छत्तीसगड राज्यांच्या कृषी मंत्र्यांची भेट घेतली होती.