पुणे : शेतीतून अधिक उत्पादन वाढीसाठी जिवाणूयुक्त सेंद्रिय खते वापरणे आवश्यक आहे, असे मत जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी व्यक्त केले. राजगंगा फर्टिलायझर्स अँड केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या उत्पादनांच्या उद्घाटन समारंभप्रसंगी डॉ. दिवसे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते म्हणाले कि, शेती टिकवण्यासाठी व अधिक उत्पादन वाढीसाठी जिवाणुयुक्त सेंद्रिय खत वापरणे काळाची गरज बनली आहे. शेती व्यवसाय सुधारण्यासाठी आणि कृषी साखळी मजबूत करण्यासाठी सेंद्रिय खते वापरणे अनिवार्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्याचे माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले कि, पारंपरिक शेती व्यवसायात बदल करावा व सेंद्रिय खतांचे महत्व जाणून त्यांचा योग्यरित्या वापर करून घेऊन जमिनीचा पोत वाढवावा. त्यामुळे शेतकरी बांधवांच्या शेती उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक प्रगती करणे शक्य होते. महाराष्ट लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, राजगंगा फर्टिलायझर्स अँड केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत सेंद्रिय खतांचे उत्पादन करून ती खते सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यत पोहचवली जात आहेत. त्यामुळे राज्यात कृषी क्षेत्रात अमुलाग्र क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही, असे मत मांडले.
राजगंगा ग्रुपचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. राजेराम प्रभू घावटे म्हणाले कि, शेतकरी बांधवांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडली पाहिजे, असे सतत वाटत होते. त्यातूनच शेती उत्पन्न वाढून शेतकरी सुखी-समाधानी व्हावा, यासाठी जिवाणूयुक्त सेंद्रिय खतांची निर्मिती करण्यात आली. माझ्या या सर्व प्रवासात व्यवस्थापकीय संचालक प्रसाद राजेराम घावटे यांनी मोलाची साथ दिल्याचे त्यांनी सांगितले. राजगंगा ग्रुपने जनहिताचा वसा अंगिकारला असून तो यापुढेही कायम राहील, असेही डॉ. राजेराम प्रभू घावटे यांनी सांगितले. यावेळी प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारीवाल, एनआयए (भारत सरकार)अध्यक्ष राजेश शुक्ला, सहकार आयुक्त दीपक तावरे, जे के शुगर्सचे सहसंस्थापक उप्पल शाह, दीपक फर्टिलायझर्सचे विजयराव पाटील (निवृत्त उपाध्यक्ष), विश्वराज महाडिक (चेअरमन- भीमा सहकारी साखर कारखाना) आदी मान्यवर उपस्थित होते.