पुणे : गेल्या काही वर्षांपासून ऊस पिकात बुरशी, सूक्ष्मजंतू, विषाणू, फायटोप्लाझ्मा, सूत्रकृमी, अन्नद्रव्यांची कमतरता, परोपजीवी वनस्पती यामुळे रोगांचा प्रादुर्भाव होतो आहे. अलीकडे हवामानातील बदलांमुळे विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. रोगांमुळे तसेच विकृतीमुळे ऊस उत्पादन व साखर उताऱ्यात कमी-अधिक प्रमाणात घट दिसून येत आहे. उसाचे हेक्टरी उत्पादन वाढ तसेच साखर उतारा वाढविण्यासाठी विषाणूजन्य रोगांसह इतर रोगांचे प्रभावी नियंत्रण व व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. प्रादुर्भावाच्या लक्षणांनुसार रोगाची ओळख व त्यांचे प्रमाण ओळखून नियंत्रणाबाबत उपाययोजना करणे गरजेचे आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे ऊसरोग शास्त्र विभागातील डॉ. गणेश कोटगिरे आणि डॉ. ए. डी. कडलग यांनी सांगितले की, राज्यात व्यापारी लागवडीकरिता वेगवेगळ्या हंगामासाठी अनेक ऊस जातींची शिफारस करण्यात आली आहे. परंतु सर्व जाती कोणत्या ना कोणत्या तरी रोगास कमीअधिक प्रमाणात बळी पडतात. राज्यातील ऊस पिकामध्ये साधारणपणे ३० रोगांची नोंद झालेली आहे. राज्यात कोसी ६७१, को ८६०३२, कोव्हीएसआय ९८०५, कोएम ०२६५, एमएस १०००१, व्हीएसआय ०८००५ या ऊस जातींचे क्षेत्र वाढते आहे. याशिवाय अलीकडे कोएम ९०५७, कोएम १५०१२, कोव्हीएसआय १८१२१ या नवीन शिफारशीत जाती लागवडीस उपलब्ध झालेल्या आहेत.
किडींच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि निकृष्ट बेण्याच्या वापरामुळे विविध विषाणूजन्य रोगांचे प्रमाण वाढत आहे. खोडवा पिकामध्ये रोगाचे प्रमाण लागण पिकापेक्षा जास्त दिसते. यासाठी शेतकऱ्यांनी रोगप्रतिकारक ऊस जातींची लागवड करावी. उति संवर्धित रोपांपासून बेण्याची वाढ केलेल्या बेणे मळ्यात रोगाचे प्रमाण कमी असते. म्हणून अशा बेणेमळ्यातून बेणे लागणीसाठी घ्यावे. रोगाचा प्रसार प्रामुख्याने मावा या किडीमार्फत होते. मावा किडीचे एकात्मिक नियंत्रण करावे.मावा कीड नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड ०.३ मिलि वापरावे, माती परीक्षण अहवालानुसार सेंद्रिय, रासायनिक व जैविक खतांचा वापर करावा आणि रोगग्रस्त पिकाचा खोडवा घेऊ नये असे सांगण्यात आले आहे.