कोल्हापूर : दत्त साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे, असे काम करीत आहोत. कारखान्याचे विश्वस्त म्हणून आम्ही विश्वासार्हता जपली आहे. त्यामुळे सभासदांनी पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवून आणि पाठबळ देऊन आमच्या दत्त शेतकरी विकास पॅनलला साथ द्यावी, असे आवाहन ‘दत्त’चे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी केले. दत्त शेतकरी विकास पॅनलच्या वतीने जयसिंगपूर येथील मर्चंट असोसिएशनच्या सभागृहात संवाद दौरा झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आप्पासो खामकर होते.
अध्यक्ष पाटील म्हणाले की, कारखान्याने पुरात बुडालेला ऊस आणि जळीत ऊस गाळपास आणून त्या उसाला एफआरपीप्रमाणे दर देऊन शेतकऱ्यांना नुकसानीपासून वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांनी २०० टन उसाचे उत्पादन घ्यावे याकरिता कारखाना मार्गदर्शन करीत आहे. यावेळी अशोकराव कोळेकर, संभाजी मोरे, मिलिंद शिंदे, रणजित कदम, प्रकाश बेलवलकर, अशोक निर्मळ, ज्युबेदा तांबोळी, महावीर चकोते, महावीर देसाई, सर्जेराव पवार, बजरंग खामकर यांची भाषणे झाली.