सांगली : केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याबरोबर दिल्लीत बैठक झाली असून, लवकरच साखरेची MSP अर्थात किमान आधारभूत किंमत ४,२०० रुपये करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे. याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळात निर्णय घेण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघा (NFCSF) चे अध्यक्ष आणि राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाचे संचालक माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
सांगली जिल्ह्यातील वाळवा येथे क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या १०२ व्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी पाटील आले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत पाटील यांनी सहकारी साखर कारखानदारीबाबत पुढील दहा वर्षांचा रोड मॅप बनविला असल्याचे सांगितले. अध्यक्ष पाटील म्हणाले की, साखर उद्योगात आमूलाग्र बदल केले जाणार आहेत. उसाची एफआरपी वाढत असताना त्या तुलनेने साखरेचे दर वाढलेले नाहीत. त्यामुळे कारखान्यांना मिळणारी रक्कम तुटपुंजी आहे. साखर उद्योग वाचवायचा असेल तर साखरेचे किमान मूल्य प्रती क्विंटल ४,२०० रुपये करावे, अशी मागणी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत दिल्लीत झालेल्या बैठकीत केली होती. त्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे.