कोल्हापूर:शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत दाखल ५३ उमेदवारांच्या अर्जांपैकी १३ उमेदवारांचे अर्ज छाननी प्रक्रियेत अवैध ठरले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ही माहिती दिली. कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीकरिता अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत ५३ उमेदवारांनी ८३ अर्ज दाखल केले होते. गुरुवारी सकाळी दत्त कारखाना कार्यस्थळावरील निवडणूक कार्यालयात दाखल उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया झाली. दरम्यान, सत्तारूढ चेअरमन गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्री दत्त शेतकरी विकास पॅनेलचे मागासवर्गीय ऊस उत्पादक गटातून आणि ‘ब’ वर्ग संस्था गटातून उमेदवार बिनविरोध होणार असल्याचे चित्र आहे.
ऊस उत्पादक ‘अ’ वर्ग सभासद गटातून १०, ऊस उत्पादक मागासवर्गीय गटातून १ आणि महिला ऊस उत्पादक गटातून २ असे एकूण १३ उमेदवारांचे १४ अर्ज छाननीत उडाले, तर चारही गटांतील ४० उमेदवारांचे ६९ वैध ठरले. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, जिल्हा सहायक उपनिबंधक सुनील धायगुडे आदी यावेळी उपस्थित होते. शनिवारी (२० जुलै) दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. यानंतर उमेदवारांच्या चिन्हांचे वाटप केले जाईल. अर्ज माघारीनंतरच ‘दत्त’च्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. छाननीत तानाजी डोंगरे, संजय घेवडे, विजय महाडिक, बापूसो जगनाडे, संभाजी माने, शिवाजी मोडके, सुशांत नाईक, राजाराम जाधव, शहाजी गावडे, शामराव पाटील, सजाबाई भोगावे, पार्वती कोळी, अनिल भोसले यांचे अर्ज अवैध ठरले आहेत.