नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. संगणक आणि लॅपटॉप अचानक बंद पडत आहेत. जगभरातील बॅंका आणि विमानसेवेला त्याचा मोठा फटका बसला आहे. मायक्रोसॉफ्टने या बिघाडाची दखल घेतली असून एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत मायक्रोसॉफ्टने यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने जगभरातील संगणक आणि लॅपटॉप प्रभावित झाले आहेत. लवकर ही सेवा पूर्ववत करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे कंपनीने म्हटले आहे.
क्राऊडस्ट्राईकने यासंदर्भात निवेदन जारी केले आहे. आम्ही या तक्रारींची माहिती घेत असून जोपर्यंत पुढील सुचना येत नाही, तोपर्यंत यूजर्सनी वाट बघावी, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. याबरोबरच विंडोजवर चालणाऱ्या संगणकांमध्ये बीएसओडीची समस्या निर्माण झाली असून यूजर्सनी स्वत:हून या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करू नये, अशी सूचना देखील करण्यात आली आहे. मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत झालेल्या या बिघाडाचा फटका भारतासह जगभरातील बॅंका आणि विमान सेवेलाही बसला आहे. जगातील अनेक विमानतळावरील सर्व्हर ठप्प झाल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रवाशांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. स्पाईसजेटनेही विमानसेवा ठप्प झाल्याचे म्हटले आहे.