कोल्हापूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २८ जुलैला कोल्हापुरात, वारणानगरमध्ये विविध कार्यक्रम

कोल्हापूर : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या दि. २८ जुलैला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या दि. २८ जुलैला सकाळी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतील. त्यानंतर वारणेला विविध कार्यक्रमासाठी जातील. तिथे नेमका काय कार्यक्रम आहे हे गोपनीय ठेवले आहे. सकाळी ११ ते ५ यावेळेत त्या कोल्हापुरात आहेत. त्यांचे आगमन, स्वागत, सुरक्षा यासह संपूर्ण दौऱ्याच्या नियोजनावर शुक्रवारच्या बैठकीत चर्चा झाली व प्रत्येकाकडे जबाबदारी दिली.

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात दौऱ्याचे नियोजन करण्यात आले. यापूर्वी भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन हे शिवाजी विद्यापीठाचे उद्घाटनासाठी १९६२ ला कोल्हापुरात आले होते. बालकल्याण संकुलाच्या इमारतीचे उदघाटन त्यावेळी त्यांच्या हस्ते झाले होते. त्यापूर्वी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या विनंतीवरून त्यांनी उपराष्ट्रपती असताना भक्तिसेवा विद्यापीठ हायस्कूलला १९५५च्या सुमारास भेट दिली होती. त्यानंतर माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुलकलाम आणि प्रतिभाताई पाटील यादेखील कोल्हापूरला आल्या होत्या. कलाम यांनी वारणेलाही भेट दिली होती. त्यानंतर प्रथमच दीर्घ कालावधीनंतर राष्ट्रपती कोल्हापुरात येत आहेत. बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी संबंधित विभागांची बैठक घेऊन त्यांना दौऱ्याच्या नियोजनाच्या तयारीबाबत सूचना दिल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here