कोल्हापूर : ‘श्री दत्त’ कारखान्याच्या १८ जागांसाठी २५ उमेदवार रिंगणात; उद्या होणार मतदान

कोल्हापूर : शिरोळ श्री दत्त कारखान्याच्या निवडणुकीत संचालक पदाच्या १८ जागांकरिता उद्या, बुधवारी (दि. २४) कारखान्याच्या कार्यस्थळावर मतदान प्रक्रिया घेण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी याची घोषणा केली. अ वर्ग ऊस उत्पादक गटातील १६ जागेसाठी २२ उमेदवार आणि अ वर्ग ऊस उत्पादक महिला गटातील २ जागांसाठी ३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, असे त्यांनी सांगितले.

ऊस उत्पादक अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील एका जागेसाठी एकच अर्ज आणि बिगर ऊस उत्पादक व संस्था गटातील दोन जागांसाठी दोन अर्ज असल्याने या दोन्ही गटांतील निवडणूक बिनविरोध झाली आहे. एकूण तीन संचालक निवडून आले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान सोमवारी घेण्यात येणारी सर्वसाधारण सभा बुधवारपर्यंत तहकूब करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित सर्वसाधारण सभेत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी स्वागत केले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले की, ‘अ’ वर्ग ऊस उत्पादक अनुसूचित जाती जमाती गटातील एक जागा आणि बिगर ऊस उत्पादक व संस्था गटातील दोन जागांसाठी तेवढेच अर्ज आल्याने दोन्ही गटातील संचालकपदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे.

सुरेश कांबळे, रणजीत कदम, इंद्रजित पाटील हे तिन्ही उमेदवार संचालक म्हणून निवडून आले आहेत. आता १८ जागांसाठी २२ उमेदवार रिंगणात आहेत. कारखाना कार्यस्थळावरील ६७ मतदान केंद्रांवर बुधवारी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होईल. लगेच गुरुवारी, दि. २५ जुलै रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे. दरम्यान, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सुनील धायगुडे यांनी आभार मानले.

साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here