कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावल्याने महापुराचा धोका वाढला आहे. पुणे-बेंगलोर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर पाणी आले आहे. असाच दमदार पाऊस पडल्यास महामार्गावर पाणी येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सोमवारीच पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडल्याने कोल्हापूरकरांची धाकधूक वाढली आहे.पावसाचा जोर आणि धरणातून होणारा विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, स्थलांतराची तयारी सुरू केली आहे. मंगळवारी सकाळी 7 वाजता राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ४१.५ फुट इतकी होती. नदीची धोका पातळी ४३ फुट असून पुराचा धोका वाढला आहे. तब्बल ७९ बंधारे पाण्याखाली गेले असून, कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पंचगंगा पाणी पातळीत वाढ सुरूच असून, ती संथगतीने ४३ फूट या धोका पातळीकडे चालली आहे.
जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. पाण्याची पातळी वाढत राहिल्यास पुराचे पाणी येणाऱ्या भागातील नागरिकांनी वेळेत स्थलांतरित होऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.पूरस्थितीच्या अनुषंगाने कोल्हापूर महापालिकेने २०२१ मध्ये शहरात महापुराचे पाणी आलेल्या ठिकाणांची यादी जाहीर केली आहे. यामुळे पूर पातळी जशी वाढत जाईल, त्यानुसार शहरातील त्या-त्या ठिकाणच्या नागरिकांनी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन करण्यात आले.जिल्ह्यातील प्रमुख १६ धरणांपैकी चिकोत्र (५० मि.मी.) व आंबेओहोळ (३२ मि.मी.) वगळता उर्वरित १४ धरण क्षेत्रांत सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत अतिवृष्टीची नोंद झाली. कोदे धरण क्षेत्रात २६४ मि. मी., तर तुळशी परिसरात २३९ मि.मी पाऊस झाला. जंगमहट्टीत ८४ मि.मी. पाऊस झाला अन्य ११ धरण क्षेत्रांत १०० मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाला.