कोल्हापूर : शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी आज, बुधवारी मतदान सुरू करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहिल. एकूण ६७ केंद्रांवर मतदान होणार आहे. तर उद्या, गुरुवारी मतमोजणी व निकाल जाहीर केला जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. गेले महिनाभर कारखाना निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यापैकी सत्ताधारी श्री दत्त शेतकरी विकास पॅनेलच्या ३ जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे १६ जागांसाठी २५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
सत्ताधारी श्री दत्त शेतकरी विकास पॅनेलने सर्व १६ जागांवर उमेदवार उभे केले आहेत तर विरोधी दत्त कारखाना बचाव पॅनेलतर्फे केवळ ६ जागा लढवल्या जात आहेत. मतदानामुळे जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कारखाना मल्टिस्टेट असल्याने कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील ११८ गावांतील २६ हजार ७२३ सभासद आहेत. दरम्यान, उद्या, गुरुवारी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होईल. लगेच निकाल जाहीर होणार आहे. उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, जिल्हा उपनिबंधक सुनील धायगुडे यांच्यासह अधिकारी निवडणुकीचे कामकाज पाहत आहेत.