एफआरपी थकीत प्रकरण: साखर आयुक्तालयाकडून ११ साखर कारखान्यांवर आरआरसीची कारवाई

पुणे: राज्यात आगामी गाळप हंगामाची जोरदार तयारी सुरु झाली आहे, मात्र राज्यातील अनेक साखर कारखान्यांकडे एफआरपी थकीत असल्याची माहिती साखर आयुक्तालयाच्या एफआरपी रिपोर्टमधून समोर आली आहे. एफआरपी थकीत प्रकरणी साखर आयुक्त कार्यालयाकडून ११ साखर कारखान्यांवर आरआरसीची कारवाई करण्यात आली आहे. ऊस बिले थकल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कुटुंबाचा खर्च भागविण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना बँका, पतसंस्था आणि खासगी सावकारांच्या कर्जाचा आधार घ्यावा लागत आहे.थकीत ऊस बिले लवकरात लवकर मिळावीत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.

हंगामात १० कोटी ७६ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले आहे. तर वाहतूक आणि तोडणी खर्च पकडून ३६ हजार ७५८ कोटी रूपये एफआरपी शेतकऱ्यांने देणे गरजेचे होते. पण त्यातील ३६ हजार ५७० कोटी रूपये एफआरपी देण्यात आलेली आहे.त्यामुळे १८८ कोटी रूपयांची एफआरपी कारखान्यांकडे थकीत आहे. एकूण एफआरपी रक्कमेच्या ९९.४९ टक्के रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे. यंदा राज्यात २०८ साखर कारखान्यांनी गाळप केले असून त्यातील १८१ साखर कारखान्यांनी एफआरपीची पूर्ण रक्कम दिली आहे. तर २७ साखर कारखान्यांकडे १८८ कोटी रूपये थकीत आहेत. साखर आयुक्तालयाकडून कारवाई करण्यात आल्याने शेतकऱ्यांना ऊस बील मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here