कोल्हापूर : गेल्या आठवडाभरापासून पावसाची संततधार सुरू आहे. शेतात पाणी तुंबून राहिल्यामुळे हुमणींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत झाली आहे. मध्यंतरीच्या काळात पिकांवर किडीसह हुमणीचा प्रादुर्भाव जाणवू लागला होता. शेतकऱ्यांनी हुमणीला प्रतिबंध करण्यासाठी आळवणीचे प्रयोग सुरू केले होते. पण, उसाच्या मुळाला औषध सोडल्यानंतर हुमणी अधिक खोल जात होती. ओलावा नसलेल्या ठिकाणी आळवणीचाही काही उपयोग होत नसल्याचे दिसले होते. शेतात पाणी तुंबून राहणे हाच एक पर्याय राहिला होता. त्यासाठी जोरदार पावसाची गरज होती. आता पडलेल्या जोरदार पावसाने हुमणी कीड कमी झाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात ऊस पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते या पिकाला हुमणींचा अधिक फटका बसू लागला होता. यंदा वळीव पाऊस चांगला झाला तरी जून महिन्यात पावसाला फारशी गती नव्हती. जुलैच्या मध्यावर पावसाला जोर नव्हता. त्यामुळे पिकांवर किडींचे प्रमाण वाढू लागले होते. शेतातून पाणी बाहेर पडले नसल्याने हुमणीचा प्रादुर्भाव वाढू लागला होता. आता पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे शेतांमध्ये पाणी चांगलेच तुंबले आहे. त्यामुळे हुमणी कमी झाली आहे. दुसरीकडे वादळी वाऱ्याचा फटका ऊस पिकाला बसला आहे. काही ठिकाणी शेतात पाणी तुंबल्याने उसाची मुळे सैल झाली आहेत. काही ठिकाणी ऊस पडला आहे.