कोल्हापूर : श्री दत्त शेतकरी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्तारूढ श्री दत्त शेतकरी विकास पॅनेलने प्रचंड मताधिक्य घेऊन सर्व १८ जागा जिंकल्या. चेअरमन गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने विरोधी धनाजी चुडमुंगे यांच्या नेतृत्वाखालील दत्त कारखाना बचाव पॅनेलचा दारुण पराभव केला. जिल्हाधइकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांनी दुपारी तीन वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दत्त कारखाना निवडणुकीतील विजयी उमेदवारांची नावे सांगितले. केंद्रीय प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर विजयी उमेदवारांची नावे घोषित केली जातील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले.
बुधवारी झालेल्या निवडणुकीत २१ पैकी १८ जागांसाठी मतदान झाले होते. सत्ताधारी गटाचे तीन उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले. कारखाना कार्यस्थळावर सकाळी आठ वाजता ६७ टेबलांवर मतमोजणी सुरू झाली. चेअरमन गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली दत्त शेतकरी विकास पॅनेलने सर्वच्या सर्व १८ जागा मोठ्या फरकाने जिंकल्या. विजयी उमेदवारांमध्ये गणपतराव पाटील, अमर यादव, अनिलराव यादव, अरुणकुमार देसाई, बाबासाहेब पाटील, बसगोंडा पाटील, दरगू गावडे, ज्योतीकुमार पाटील, निजामसो पाटील, प्रमोद पाटील, रघुनाथ पाटील, शरदचंद्र पाठक, शेखर पाटील, सिद्धगोंडा पाटील, विनया घोरपडे, विश्वनाथ माने, अस्मिता पाटील व संगीता पाटील. चेअरमन गणपतराव पाटील म्हणाले की, सभासदांनी आम्हाला पुन्हा काम करण्याची संधी दिली आहे. त्यांच्या विश्वासाला पात्र राहून भविष्यात शेतकरी सभासदांच्या हितासाठी जोमाने काम करू. दरम्यान, आज, शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात नूतन संचालक मंडळाच्या विशेष बैठकीत चेअरमन निवड होणार आहे.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.